किल्ला पर्यटनाला वाढता प्रतिसाद…

इको-प्रोची सोशल मीडियातून हाक, चंद्रपूरकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद…

चंद्रपूरः इको-प्रोतर्फे फेसबुक-व्हॉटस्अपच्या माध्यमातून चंद्रपूर किल्ला पर्यटनासाठी येण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार नागरिकांनी प्रतिसाद देत भल्या पहाटे उठून
किल्ला पर्यटन- हेरीटेज वॉकमध्ये
सहभाग घेतला. 17 Jun 2018.

मागील 1 मार्च 2017 पासून सुरू असलेल्या चंद्रपूर किल्ला परकोट स्वच्छता अभियानाला आज 446 दिवस पूर्ण झाले. किल्ला स्वच्छता अभियान सोबतच दुस-या टप्पाचे काम सुरू झाले आहे. याव्दारे चंद्रपूर किल्ला पर्यटनास चालना देण्यासाठी ‘हेरीटेज वॉक’ सारख्या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली असून, याला नागरीकांचा उत्तम प्रतीसाद मिळत आहे. चंद्रपूर किल्ला स्वच्छतेचे अभियान अंतीम टप्पात आलेले असताना आता इको-प्रो च्या वतीने चंद्रपूरकर नागरिकांत जनजागृती व्हावी, आपला ऐतिहासिक वारसा सुध्दा जवळून पाहावा, इतिहास जाणून घेता यावा, पर्यटनाच्या दृष्टीने विकास व्हावा, चंद्रपूर शहराची एक वेगळी ओळख निर्माण व्हावी या दृष्टीने प्रयत्न केले जात आहे.

सोशल मीडिया फेसबुक व वॉट्सअॅप वरून या हेरीटेज वॉक साठी येण्याचे आवाहन करण्यात आले होते. विशेष की, सदर हेरीटेज वॉक मध्ये सहभागी होण्यासाठी पहाटे 5ः30 वाजता दाखल होत नागरिकांना किल्ला पर्यटनासाठी सुध्दा उत्साह दाखविला. असा प्रतीसाद म्हणजे इको-प्रोच्या मेहनतीला आलेले फळ असून, हा सहभाग संपूर्ण इको-प्रो टिमचा उत्साह वाढविणारा असल्याचे मत यावेळी इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी व्यक्त केले.

सध्या कुठलीही विशेष तयारी न करता, आहे त्या परिस्थितीत किल्ला पर्यटन सुरू करण्यात आले असून या स्थितीत सुध्दा नागरीकांच्या प्रतिक्रिया उत्साहवर्धक आहे. याकडे हवे तसे लक्ष पुरातत्व विभाग व प्रशासनाने दिल्यास किल्ला पर्यटन विकास योग्य पध्दतीने करणे सोईचे होणार आहे.
अगदी सकाळी सहभागी झालेल्या चंद्रपूरकर पर्यटक नागरीक, जेष्ठ मंडळी, लहान मुले यांना चंद्रपूरचा वैभवशाली गोंडराज्यांचा इतिहास, ऐतिहासिक वास्तुची माहिती, मंदिराची माहीती तसेच किल्लाच्या इतिहास सांगून किल्लाची दुरवस्था आणि राबविण्यात येत असलेले स्वच्छता अभियान याची माहीती सचित्र देण्यात आली. यांनतर किल्लावरून फेरफटका मारीत किल्ला आणी इतिहासाची माहीती देण्यात आली. यावेळी बुरूज 4, 5, 6, 7, 8, व 9 वरून फिरविण्यात आले. या प्रवास दरम्यान अंचलेश्वर गेट, बगड खिडकी, मसन खिडकी, गोंडराजे समाधीस्थळ व अंचलेश्वर मंदी आदी ठिकाणी माहीती देण्यात आली.

आलेल्या पर्यटक नागरिकांनी ही उत्तम संधी प्राप्त झाली असून, अनेक वास्तू आणी इतिहास कळला यापुढे होणा-या अशा उपक्रमाना अनेक नागरिकांना आम्ही सोबत घेउन येऊ असे सांगून आजच्या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले.