June 2019

You Are Here: Home / June 2019

पठाणपुरा गेट बाहेर ‘अपघात प्रवण स्थळ’ निर्माण होण्याचा धोका

Categories: Tags:

भविष्यातिल धोका ओळखून रस्ता बांधकामातील सरेखामध्ये वाढ करण्याची आयुक्तांकडे इको-प्रो ची मागणी

चंद्रपूरः चंद्रपूर शहरातील पठाणपुरा गेट ते बिनबा गेट परकोटालगत बाहेरून रस्त्याचे बांधकाम प्रगतीत आहे. सदर रस्ता हा पठाणपुरा गेट पर्यत बांधण्यात येणार आहे या रोड बांधकामाचे इको-ने स्वागत केले आहे. शहरातील वाहतुकीची कोंडी यामुळे कमी होण्यास मदत होईल. मात्र, या रस्त्याच्या बांधकामामुळे  पठाणपुरा गेट च्या अगदी बाहेर ‘अपघात प्रवण स्थळाची’ निर्मिती होण्याचा धोका लक्षात घेत चंद्रपूर शहर महानगरपालीकेचे आयुक्तांना इको-प्रोतर्फे निवेदन सादर करीत रस्ता बांधकाम सरेखा मध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे. 
पठाणपुरा गेट बाहेर हनुमान मंदीर असून, हे ठिकाण अगदी पठाणपुरा गेट च्या समोर आहे. सध्या अस्तित्वात असलेला रस्ता पठाणपुरा ते नांदगाव व दुसरा पठाणुरा ते आरवट-मारडा ही दोन्ही रस्ते गेटच्या परस्पर विरूध्द दिशेकडुन गेटकडे येतात. सदर रस्ता सध्या अस्तित्वात असलेले प्र्राचीन हनुमान मंदीर आणी गेटच्या मधातुन जातो. मंदीर आणि गेट मधील अंतर फार तर 10 मिटर पेक्षा कमी असेल. सध्या या गेटच्या दोन्ही बाजुने गेटच्या आत वाहतुक सुरू आहे. वेकोली च्या रेतीची अवजड वाहतुक सुरू असते. सध्या परिस्थीतीत बरेचदा वाहतुकीची समस्या निर्माण होत असते. सदर रस्त्याचे बांधकाम झाल्यानंतर शहराबाहेर जाणा-या वाहनाची ये-जा मोठया प्रमाणात वाढेल आणी या वाहनांची गती सुध्दा अधिक असेल. शहरास बायपास करून जाणारे जड व अवजड वाहनांची वर्दळ अधिक प्रमाणात होईल. गेटच्या बाहेर या ठिकाणी चार दिशेच्या वाहनांना अगदी समोर येईस्तोवर समोरील वाहनांचा अंदाज येत नाही. सदर रस्ता बांधकाम झाल्यावर ही समस्या अधिक तिव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी अनियंत्रीत वाहनामुळे आणि समोरच्या वाहनांचा अदांज येणार नसल्याने अपघाताची तिव्र शक्यता निर्माण होईल याबाबत इको-प्रो च्या वाहतुक विभाग व आपातकालीन व्यवस्थापन विभागाने विस्तृत चर्चा केल्यानंतर इको-प्रो संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे यांच्या नेतृत्वात आयुक्तांची भेट घेत निवेदन देण्यात आले.
या निवेदनाची त्वरीत दखल घेत महानगरपालीकेचे आयुक्त संजय काकडे यांनी पठाणपुरा बाहेरील या परिसरास भेट देत पाहणी केली. यासंदर्भात त्वरीत उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याची निर्देश संबधीत अधिकारी यांना दिले. यावेळी महानगरपालीकेचे शहर अभियंता महेश बारई, अनिल घुमडे, इको-प्रो चे बंडु धोतरे, नितीन रामटेके, अमोल उट्टलवार व स्थानीक नागरीक उपस्थित होते. यावेळी सदर अपघात प्रवण स्थळ निर्माण न होता रस्ताच्या बांधकामाच्या सरेखा मध्ये वाढ करून वळण रस्ता घेतांना प्राचीन हनुमान मंदीर परिसराच्या सौदर्यात भर पडेल या पध्दतीने नियोजन करण्याची विनंती बंडु धोतरे यांनी केलेली आहे. आयुक्तांच्या त्वरीत आणि सकारात्मक प्रतिसादाकरीता इको-प्रो च्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

प्रत्येक घरी करणार ‘रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग’

Categories: Tags:

उपगंलावार लेआउट मधील नागरीकांचा संकल्प
इको-प्रोच्या रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग अभियानास नागरीकांचा सकारात्मक प्रतिसाद

चंद्रपूरः इको-प्रो संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग’ जनजागृती अभियानास नागरीकांचा उस्फुर्त प्रतीसाद मिळु लागला आहे.
5 जुन ‘जागतीक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत इको-प्रो संस्थेच्या वतीने चंद्रपूर शहरात ‘रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग जनजागृती व संकल्प अभियान’ सुरू करण्यात आलेले आहे. या माध्यमाने संस्थेच्या सदस्यांनी संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे व पर्यावरण विभाग प्रमुख नितीन रामटेके यांच्या मार्गदर्शनात शहरात ठिकठिकाणी फिरून, पब्लीक स्पेस, बागेत, जिल्हा स्टेडीअम येथे पत्रके वाटुन, छोटेखानी बैठका घेत शहरातील भुजल पातळी खालावत जात असल्याबाबत, आपल्या घरी बोरवेल-विहीरींना रेनवाॅटर हाॅर्वेस्टींगची गरज आदी बाबत जनजागृती करण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमाने नागरीकांना पावसाचे पाणी आपल्या घरांच्या छतावर पडल्यानंतर त्याचे भुुजल जल पुर्नभरण कसे करायचे याबाबत तांत्रीक मदत देण्यात येणार आहे. यामुळे नागरीकांना सुध्दा आता पाण्याचे महत्व पटु लागले आहे. नागरीकांच्या मागणीनुसार त्या-त्या भागात जाउन छोटेखानी कार्यक्रम घेण्यात येत आहे.
अशा पध्दतीने तुकुम, गुरूव्दारा परीसरातील उपगंलावार लेआउट मधील नागरीकांनी रविवारला सकाळच्या वेळेस इको-प्रोच्या माध्यमाने काॅलनीमधील नागरीकांसाठी रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग जनजागृती व आवश्यक्ता याबाबत छोटेखानी बैठक आयोजीत करण्यात आलेली होती. बैठकीनंतर पावसाचे पाणी आपल्या बोरवेल व विहीरीस पुर्नभरण करण्यासंदर्भात तयारी दर्शवीली. सर्वानी सकारात्मक प्रतिसाद देत शहरातील रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग पहीली काॅलनी असेल असा संकल्प सुध्दा केला. विशेष म्हणजे या काॅलनीतील नागरीकांनी 100 पेक्षा अधिक झाडे लावत त्यांचे संगोपन करून त्याची जोपासना केलेली आहे. सदर काॅलनीत फिरतांना हिरवीगार होण्यामागे त्याचे प्रयत्न दिसुन येतात. संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी काॅलनीच्या पर्यावरणपुरक बाबी राबविण्याकरीता तसेच रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग जनजागृती अभियानात सहभागी होत संकल्पासाठी सर्व नागरीकांचे अभिनंदन करीत आभार व्यक्त केले आहे.
यावेळी उपंगलावार काॅलनीतील राजेश सिंग चैहान, सदर लेआउट समीतीचे अध्यक्ष सतीश अवताडे, उपाध्यक्ष तुषार देशमुख, हरीश अग्रवाल, सचिव श्रावण नन्नावरे, हेमंत गज्जलवार, हरडे सर, मनीष कन्नमवार, नागदेवे सर, फटींग सर, प्रशांत वैदय, पाठक मॅडम, अग्रवाल मॅडम, हिवरे सर, बागडे सर, कामडे सर, मुगल सर आदी प्रामुख्याने उपस्थित होते तर इको-प्रो चे बिमल शहा, प्रमोद मलीक, सुधीर देव, अमोल उटटलवार, सचिन धोतरे, सुनील पाटील, धर्मेद्र लुनावत, आकाश घोडमारे, राजु काहीलकर आदी सहभागी झाले होते.
चंद्रपुर शहरातील भुजल पातळी वाढविण्यास ‘रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग’ लोकचळवळ व्हावी याकरीता प्रत्येक नागरीकांची गरज असुन कुणाची वाट न बघता यंदा पावसाळयात माझ्या घरांच्या छतावर पडणारे पाणी वाहुन जाउ न देता, मी बोरवेल-विहीरीत रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग करून सोडणार असा संकल्प प्रत्येक नागरीकांनी करावे असे आवाहन बंडु धोतरे यांनी केले आहे.

रेनवाॅटर हाॅर्वेस्टींगकरिता सीएसआर फंडातून अनुदान द्या

Categories: Tags:

इको-प्रोची मागणी – पालकमंत्री, आमदार व जिल्हाधिकारी यांचेकडे केली मागणी

चंद्रपूर- इको-प्रो चे रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग जनजागृती अभियान सुरू असुन या माध्यमाने आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देत सिएसआर फंडातुन सुध्दा नागरीकांना अनुदान देण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
चंद्रपूर शहर हे औदयोगीक शहर आहे, या शहरालगत कोळसा खाणी, विदयुत प्रकल्प, स्टिल उदयोग, एमआयडीसी मधील उदयोग आदी आहेत. उदयोगांचे प्रदुषणामुळे चंद्रपूर शहर देशात प्रदुषणाच्या क्रमवारीत अग्रस्थानी आहे. आता तर सर्वाधीक तापमानाचे शहर म्हणुन सुध्दा देशात नाही तर जगात समोर येउ लागले आहे. अशा स्थितीत चंद्रपुर शहराची भुजल पातळी दिवसागणीक खालावत चालली आहे. शहराच्या नागरीकांकडुन खोदण्यात आलेल्या 200-250 फुट खोल बोरवेल मधुन पाणी उपसा होतोच मात्र, सभोवताल असलेल्या कोळसा खाणीच्या भुगर्भातील पाणी सतत उपसा केला जातो. ही सुध्दा भुजल पातळी खालावण्याचे महत्वाचे कारण आहे. चंद्रपुर महाऔष्णीक विदयुत केंद्र यामुळे होणारे प्रदुषण, तापमानातील वाढ, स्टिल उदयोग, इतर उदयोगाचे जलप्रदुषण यामुळे चंद्रपूर प्रदुषणाची तिव्रता नागरीक सहन करीत आहे. 
सध्या चंद्रपूर शहरात रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग लोकचळवळ होउ पाहत आहे तेव्हा उदयोगांचा सुध्दा हातभार लागावा, पर्यावरणीय या उपक्रमाच्या माध्यमातुन भुजल पातळी वाढविण्यास उदयोगांनी पुढाकार घ्यावा याकरिता उदयोगांच्या सिएसआर फंडातुन सुध्दा अडीच हजाराचे योगदान देता यावे, याकरीता जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी जिल्हाधिकारी सह, पालकमंत्री, आमदार यांचेकडे करण्यात आलेली आहे. 

यंदा चंद्रपूर शहरात निर्माण झालेली भिषण पाणी टंचाई आणि दिवसागणीक भुगर्भातील जलपातळी खालावत जात असल्याने इको-प्रो संस्थेच्या वतीने ‘जागतीक पर्यावरण दिन’ 5 जुन 2019 पासुन ‘रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग जनजागृती व संकल्प अभियान’ सुरू करण्यात आले असुन या अभियानाच्या माध्यमातुन शहरात सर्वत्र फिरून संस्थेचे कार्यकर्ते नागरीकांशी संवाद साधुन रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग चे महत्व समजावुन सांगत आहे. भुजल, भुजलाचे महत्व, भुजल पुर्नभरण, रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग आदी बाबी संदर्भात विस्तृतपणे जनजागृती करण्यात येत आहे.  
सदर अभियानाला नागरीकांचा उस्फुर्त व सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. चंद्रपूर शहर महानगरपालीका कडुन रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग करीता अडीच हजार रूपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. मात्र, एकंदरीत संपुर्ण रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग करण्यास नागरीकांना अधिक खर्च असल्याने, तसेच नागरीकांना अधिक प्रोत्साहन मिळावे याकरीता अडीच हजार अतिरीक्त अनुदान जिल्हयातील उदयोगांकडुन सिएसआर फंडातुन देण्यात आल्यास एकुण प्रत्येक नागरीकास 5 हजार रूपयाचे अनुदान देणे शक्य आहे. शहरात सुरू असलेले रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग अभियान अधिक व्यापक आणि राज्यातील इतर शहरांकरीता पथदर्शक व्हावे याकरीता स्थानीक नागरीक, स्वंयसेवी संस्था, चंद्रपूर शहर महानगरपालीका, जिल्हा प्रशासन व जिल्हयातील उदयोग समुह एकत्रीत येत कार्य करण्याची नितांत गरज असल्याचे मत संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी व्यक्त केले आहे. 
या अभियानात सर्वच घटक आता कामाला लागले असुन लवकरच याचे सकारात्मक परिणाम दिसुन येतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. प्रदुषीत, अती तापमान असलेल्या चंद्रपूर शहरातील भुजलाची पातळी वाढवण्याच्या दृष्टीने महत्वाचे या प्रकल्पास सिएसआर फंडातुन मदत झाल्यास या अभियानास गती देणे शक्य होईल. या मागणीचे निवेदन आज इको-प्रो तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगांवकर यांनी स्विकारले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे, पर्यावरण विभाग प्रमुख नितीन रामटेके, अनिल अडगुरवार, आकाश घोडमारे, सचिन धोतरे उपस्थित होते.

संघर्षांतून संवर्धनाकडे..

Categories: Tags:

लोकसत्ता टीम | June 6, 2019  | राखी चव्हाण

सरकारशी संघर्ष करून २००९ सालात या संघटनेने ‘अदानी’ समूहाची खाण रोखली आणि वन्यजीवांच्या अधिवासाचे संरक्षण केले. मात्र गेल्या काही वर्षांपासून चंद्रपूर परिसरातील किल्ल्यांचे संवर्धन करून, या तरुणांनी नवी वाट दाखवली आहे..

तरुणपणी अनेक जण विविध दिशांनी प्रयत्न करीत असतात, पण बहुतेकांचे प्रयत्न भौतिक सुखांपाशी स्थिरावतात. काही जण मात्र, समांतरपणे काही तरी वेगळे गाठण्याचा प्रयत्न करतात. त्यात त्यांना त्यांच्याही कल्पनेच्या पलीकडचे झगमगते यश मिळत असते. ‘इको प्रो’ची आर्मी काहीशी अशीच! बंडू धोत्रे या तरुणाच्या नेतृत्वाखाली बारा वर्षांपूर्वी बांधल्या गेलेल्या या संघटनेत जवळजवळ दोन हजार युवकांचा भरणा आहे. सामाजिक क्षेत्रात ही फौज कार्यरत आहे. त्यातील किल्ले स्वच्छता मोहिमेने तर देशाच्या पंतप्रधानांचेही लक्ष वेधून घेतले आहे.

या संघटनेतील कुणी शिकणारे, कुणी नोकरी करणारे तर कुणाचा व्यवसाय. पण हाक दिली तर अवघ्या तासाभरात ही सेना मोहीम फत्ते करायला निघते. चंद्रपूर जिल्ह्यातील ‘किल्ले स्वच्छता अभियान’ गेल्या दोन वर्षांपासून गाजत आहे. या शहरातील गोंड राजवटीच्या खाणाखुणा नष्ट होत चालल्या होत्या. या सेनेला आपल्याच शहराची, आपल्याच पूर्वजांची होणारी ही दैनावस्था पाहवली नाही आणि मग ‘किल्ले स्वच्छते’चे हे शिवधनुष्य त्यांनी उचलण्याचे ठरवले. या शहरात चार ऐतिहासिक प्रवेशद्वारे आहेत. त्यांपैकी पठाणपुरा प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेल्या अशुक बुरुजापासून १ मार्च २०१७ रोजी या कामाची सुरुवात झाली. सुमारे ११ किलोमीटरचा हा किल्ला म्हणजे साप, विंचवांचे घर होते. माणसे या ठिकाणी शौचाला बसत होती. त्यामुळे संघटनेतील काही युवक या स्वच्छता मोहिमेत सहभागी होताना डगमगणार, हे ओळखून बंडू धोत्रे यांनी मोहीम सुरू करण्याआधी त्यांना सेवाग्रामची सफर घडवली. गांधीजींच्या स्वच्छता मोहिमेची युवकांना ओळख करून दिली. हे सर्व पाहिल्यानंतर या युवकांचे मतपरिवर्तन झाले. चंद्रपूरला परतल्यानंतर त्यांनी ११ किलोमीटरच्या या किल्ले स्वच्छता मोहिमेत स्वत:ला झोकून दिले. हा किल्ला नाही तर ते अवशेष होते. मातीचे ढिगारे त्या ठिकाणी जमले होते. किल्ल्याची ओळख पूर्णच मिटलेली होती. मात्र, स्वच्छता मोहिमेतून या सर्व गोष्टी तेथून हटवण्यात आल्या. किल्ल्याचा मूळ दगड दिसण्याइतपत ते सुस्थितीत आणले गेले. कधी मधमाश्यांचे पोळे तर कधी सापांचा वावर आणि यातून सुटत नाही तर खाज सुटणाऱ्या वनस्पती असायच्या. मग अंगाला लिंबू आणि शेणाचा लेप लावून हे तरुण कामाला भिडले आणि लोकांच्या नजरा त्यांच्या मोहिमेकडे वळल्या. तरुणाईचा हा दिखावा नाही तर ती त्यांची आंतरिक तळमळ आहे हे लोकांना कळून चुकले. तेव्हा कुणी पाणी, कुणी चहा तर कुणी नाश्ता आणून द्यायचे. १५० दिवसांनंतर या किल्ल्याची वाट मोकळी झाली आणि प्रसारमाध्यमांनीही त्याची दखल घेतली. लोकांना चंद्रपूर शहराचा इतिहास जवळून अनुभवता आला. ही मोहीम घराघरात पोहोचली आणि लोकही त्यात जुळत गेले. स्वच्छता मोहिमेसाठी साहित्याची पूर्ती लोकांकडून होत गेली. स्वच्छता अभियानाला २०० दिवस पूर्ण झाले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’मध्ये ‘किल्ले स्वच्छता मोहिमेचा’ उल्लेख केला. त्यामुळे देशभरात प्रसिद्धी झाली. पुरातत्त्व विभागही खडबडून जागे झाले. थेट या विभागाचे महासंचालक आणि केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठकीसाठी त्यांना पाचारण करण्यात आले. आज या ११ किलोमीटरच्या किल्ल्याला आतून आणि बाहेरून ११-११ किलोमीटरची संरक्षक भिंत बांधली जात आहे. पुरातत्त्व विभागाने मग ‘इको प्रो’शी करार करून त्यांना २१ ‘मॉन्युमेंट’ दत्तक दिले. ‘अ‍ॅडॉप्ट अ हेरिटेज’ या योजनेअंतर्गत हा करार झाला (याच योजनेखाली लाल किल्ल्याचा काही भाग खासगी कंपन्यांना देण्यात आला आहे).

मग ‘किल्ला पर्यटन’ आणि ‘हेरिटेज वॉक’ला सुरुवात झाली. चंद्रपूरच्या किल्ल्यासोबत इतरही वास्तूकडे लक्ष वेधले गेले. पुढील काळात या किल्ल्याची पुनर्बाधणी करण्यात येणार आहे. त्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. यानंतर अंचलेश्वर मंदिर, अपूर्ण देवालय, गोंड राजा समाधी, जुनोन्याचे जलमहल अशा अनेक ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाचा इको प्रोने विडा उचलला आहे. किल्ल्यालगतचे अतिक्रमण काढण्यासाठी लोकांनी स्वत:च पुढाकार घेतला. या मोहिमेला आता साडेसातशे दिवस होत आहेत, आम्ही अजूनही अध्रेच काम केले आहे, अजून बरेच करायचे बाकी आहे, असे या मोहिमेतील तरुण सांगतात. २०-२५ ठिकाणी ही मोहीम सुरू होणार आहे आणि काही ठिकाणी ते सुरूही झाले आहे. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे. त्यांचा पदस्पर्श जिथे झाला, तो ऐतिहासिक वारसा आपणच जपायला हवा, हा संदेश त्यांनी दिला आणि आता राज्यातील इतरही शहरांतून तरुणाईची अशीच चळवळ सुरू होऊ पाहते आहे.

‘इको प्रो’च्या फौजेचे हे यश पहिलेच नव्हे. यापूर्वी सरकारशी संघर्षांतही या संघटनेने यश मिळवले होते. त्यांनी दिलेला अदानीचा लढा असाच देशभर गाजला होता. युवा एकत्र आले तर ते बदल घडवून आणू शकतात, हा संदेश त्यांनी दिला. ‘इको प्रो’ २००६ ला स्थापन झाली आणि त्यानंतर दोनच वर्षांत अदानीचा प्रकल्प जंगलावर गदा आणू पाहतोय हे या सेनेला कळले. ज्या जंगलात आपण भटकंती करतो, ज्या जंगलातील वन्यजीवांना आपण जाणतो, त्यांच्यावर प्रकल्पाचे संकट कोसळू द्यायचे नाही असा निर्धार त्यांनी केला. या प्रकल्पामुळे ताडोबा ते इंद्रावती व्याघ्र प्रकल्पाला जोडणारा मोठा कॉरिडॉर तुटणार होता. आधीच जिल्ह्यात अनेक खाणी होत्या. त्यामुळे प्रदूषणासारख्या गंभीर समस्येला हा जिल्हा सामोरे जात होता. त्यातच ही ‘ओपनकास्ट’ तर भारतातील सर्वात मोठी खाण होती. त्यामुळे होणारे नुकसानही मोठेच होते. या मुद्दय़ावर लोकांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा कुणीही फारसा प्रतिसाद दिला नाही. पण पर्यावरणाचा मुद्दा पटवून दिला तेव्हा सारेच गोळा झाले. ही खाण होऊ द्यायची नाही असा निर्धार या फौजेने केला आणि १५ डिसेंबर २००८ ला नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात हा चमू उपोषणाला बसला. त्या वेळी अनेकांनी सहकार्य केले. तत्कालीन वनमंत्री बबनराव पाचपुते त्यांना भेटायला आले आणि आश्वासनांची पुडी सोडून गेले. त्यासाठी समिती बनवून त्यांच्या बैठका घेतल्या, पण तो फक्त देखावा होता हे यांच्या लक्षात आले. मग पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला गेला. जुलै २००९ मध्ये १४ दिवस बंडू धोत्रे याने उपोषण केले. या वेळी अनेक संस्था, संघटना, राजकीय पक्ष त्याच्या पाठीशी उभे राहिले. उपोषणाच्या नवव्या दिवशी चंद्रपूरकरांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवला. ही वार्ता तत्कालीन केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांच्या कानावर गेली आणि ते स्वत: भेटायला आले. त्यांनी ‘खाण होऊ देणार नाही’ असे आश्वासन दिले आणि ते आश्वासन पाळलेसुद्धा! वाघांच्या आणि वन्यजीवांच्या अधिवास संरक्षणासाठी तरुणांनी उभारलेला लढा यशस्वी ठरला.

समाजासाठी काही तरी करू पाहणाऱ्या या तरुणाईच्या फौजेला अगदी सैन्याइतकीच शिस्त असू शकते हे ‘इको प्रो’मधील सहभागींकडे पाहिल्यानंतर लक्षात येते. या संघटनेचा गणवेश आहे आणि मोहिमेवर निघताना त्यांचा प्रत्येक सैनिक हा गणवेश घालूनच बाहेर पडतो. दोन हजारांपैकी सुमारे ३५३ सैनिक गणवेशधारी आहेत आणि मुख्य म्हणजे त्यात युवतींचाही समावेश आहे. गणवेश अंगावर चढवला तर आतून ऊर्मी येते ही त्यांची ठाम भावना.

‘इको प्रो’चा कोणताही सैनिक काही सर्वकाळ काम करत नाही. तो पैसा आणि प्रसिद्धीसाठीही काम करत नाही. ही सर्व मुले, मुली आपापले शिक्षण, व्यवसाय, नोकरी सांभाळूनच काम करतात. नि:स्वार्थ काम करणारी ही फळी मोहिमेवर जाण्यासाठी एका संदेशावर तयार होतात. सोयीची वेळ, संघटनेच्या १३ उपक्रमांपैकी सोयीचा उपक्रम निवडून त्यांचे योगदान सुरू असते. खरे तर समाजासाठी असणाऱ्या या मोहिमा पैशाशिवाय शक्य नाहीत, पण यांना कधी कुणापुढे हात पसरावे लागत नाही. ही सेना जेव्हा मोहिमेवर निघते तेव्हा लागणाऱ्या मदतीसाठी आपोआपच हात समोर येतात.

rakhi.chavan@expressindia.com